आता मला काही सांगावे असे वाटत नाही. अशा अवस्थेमध्ये आजही हे | सर्व धन तुमच्या सर्वांच्या जवळ उपलब्ध आहे. साधारण सेवक असेल त्याच्याहीसाठी आहे; साहित्यिक असेल, आध्यात्मिक असेल त्याच्याहीसाठी आहे, राजकीय असेल त्याच्यासाठी आणि विश्वव्यापी भावनेचा असेल | त्याच्याहीसाठी आहे. असे सर्वांच्या करिता मी माझ्या परीने सामान ठेवून दिलेले |आहे.
आपल्या लोकांचे कर्तव्य आता हेच असू शकते की ह्या वाङ्मयाला करोडो मुखी कानी जाऊ द्यावे; हजारो भाविकांत ती भक्ती वाढवावी आणि त्या वाङ्मयाची जी किर्ती आहे ती स्वार्थपूर्तीसाठी न पसरविता "परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्" ह्या प्रवृतीने समजून घेतली पाहिजे, वाढविली पाहिजे.
आता एकच उरलेले तुमच्या लोकांचे काम आहे की तुम्ही अव्याहत आपले सेवाकार्य चालविणे, आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे “भूता | परस्पर जडो । मैत्र जीवांचे ॥' हे साधन करणे व “अवघाचि संसार, सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक" असे कार्य इथे करणे! हेच आमचे महामंत्र आहेत! बरे असो जयगुरु !!
(बॉम्बे हॉस्पिटलमधील आपल्या रुग्णशय्येवरून वं. महाराजांनी २० ऑगस्ट १९६८ रोजी दिलेल्या आर्त संदेशातील काही अंश - टेप रेकॉर्डिंग श्री जनार्दनजी बोथे, गुरुकुंज)