राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संक्षिप्त जीवन दर्शन

02 May 2022 11:30:25

About Rashtrasant Tukdoji Maharaj
 
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे, वैश्विक मानवतेची आणि राष्ट्रीय उत्थानाची सतेज भावना हृदयात सदैव धारण केलेले महामानव होय. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा ही समरांगणावर तेजहीन झालेल्या योद्ध्यांना पुन्हा तेजवंत करण्याला सहाय्यक ठरेल अशी क्षात्रप्रेरणेची तथा जनतेला ब्रह्मनिष्ठ मानवतेच्या जाणिवांचा निर्मळ (सचैल) जीवनबोध देणारी वीरगाथा आहे. हिमालयाच्या उंचीलाही लाजवेल अशी समग्र जीवनाची तत्वनिष्ठ, देशनिष्ठ आणि मानवतानिष्ठ पैलुंची उंची त्यांच्या जीवनाला लाभलेली आहे. मानवतेच्या या ज्ञानोत्तम दार्शनिकाचा जन्म दि. ३० एप्रिल १९०९ रोजी भारतवर्षातील, महाराष्ट्र प्रांतातील, विदर्भ भूमितील, अमरावती जिल्ह्यात 'यावली (शहीद)' या गावी बंडोजी उर्फ नामदेव गणेशपंत इंगळे (वंशयाती ठाकूर, ब्रह्मभाट) व भक्तीमती मंजुळादेवी बंडोजी इंगळे या धार्मिक, आध्यात्मिक दाम्पत्याच्या पोटी, वरखेडचे सिद्धपुरुष परमहंस श्रीसमर्थ आडकोजी महाराजांच्या आध्यात्मिक गुरुत्वकृपेने यावली येथे चंद्रमौळी झोपडीत झाला.
 
महाराष्ट्रातील अकोटचे ब्रह्मनिष्ठ संत हरिबुवा आणि माधानचे अलौकिक बालांध संत गुलाबराव महाराज यांनी स्वत: या अद्भूत बाळाचे ‘माणिकदेव' असे नामाभिदान करून नामकरण विधी संपन्न केला. दुसऱ्या दिवशी विदेही संत समर्थ आडकोजी महाराजांच्या दर्शनाकरिता चिमुकल्या माणिकदेवाला घरच्या मंडळींनी वरखेडला नेले असता माणिकदेवाला पाहून परमहंस आडकोजी महाराजांच्या रोमारोमात चैतन्य फुलून आलं "माहा हो माहा" म्हणत आडकोजी बाबांनी बाल माणिकला पोटाशी धरलं नि जवळच्या ताटातील भाकरीचा लहानसा तुकडा त्याच्या इवल्याश्या ओठांना लावित आगळ्या कौतुकानं त्यांनी 'तुकड्या.. तुकड्या' असा घोषच सुरू केला. सद्गुरु समर्थ आडकोजी महाराजांनी सहजतेनं उच्चारलेलं 'तुकड्या' हे नाव पुढे माणिकदेव या जन्म नावाऐवजी 'तुकड्या' या नावाचाच प्रचार सर्वत्र प्रसिद्ध झाला. बालक 'माणिकचे' पूर्वज दत्तभक्त आणि विठ्ठलभक्त वारकरी होते. या भक्तीरसानेयुक्त अशा पवित्र कुळात माणिकचे (तुकड्याचे) बालपण फुलले. माता मंजुळादेवी ही सदैव ईश्वरभक्तीत समाधिस्थ तर भक्तीभावाने वैभवसंपन्न, मात्र आर्थिक विपन्न अशा घरात 'माणिकदेवाचे' बालपण भगवान श्रीकृष्णाच्या गोकुळातील केलेल्या अद्भूत बाललिले सारखे दिसमास, वर्षाप्रमाणे प्रफुल्लीत होत गेले. अठराविश्व दारिद्र्यामुळे मातापित्यांना विषम खडतर गृहदशा व जीवनदशा लाभलेल्या प्रतिकुल परिस्थितित माणिकदेव वृत्तीने हुड परंतु चिंतनशील होत गेले. तत्कालीन समाजव्यवस्थेत गरीबीचे चटके सहन करत माणिकदेवाच्या पित्याने बालमाणिकाला शिक्षणासाठी शाळेत दाखल केले. सदैव आत्ममग्नस्थितीत असलेल्या माणिकदेवाच्या मनाची ओढ शाळेतील चार भिंतीच्या आतील शिक्षणाऐवजी विराट निसर्गातील अमृत शिक्षणाकडे प्रर्कषाने असायची. उपजत अलौकीक बुद्धीमत्तेने शाळेच्या परीक्षेतही ते मात्र उत्तीर्ण व्हायचे. एकांती ध्यान आणि लोकांती कविता, कीर्तन हा त्यांचा बालछंद असायचा. पोहणे, अश्वारोहण, कुस्ती आदि नव्या कला निर्भयतेने बालक माणिकदेव आत्मसात करी. चांदुरबाजारच्या विमलानंद भारतीकडून छंद गायन, यावलीच्या हनवतीबुवांकडून खंजिरी आणि सातळीकोतळीकर महाराजांकडून एकतारी चिपळी आदि छंदसाधनकला माणिकदेवानी सहज अवगत केल्या होत्या. पित्याच्या तामसी स्वभावधोरणामुळे बालपणीच 'माणिकदेवाला' मातेबरोबर गृहत्याग करण्याची पाळी आली त्यामुळे माता मंजुळेसह मामांचे गाव वरखेड, (जि.अमरावती) क्षेत्री काहीकाळ निवास केल्याने नाथपंथी विदेही संत समर्थ आडकोजी महाराजांच्या सहवासात बाल माणिकदेवाचं अंतरंग भगवद्भक्तीच्या सत्संगाने पवित्र व ईश्वरदर्शनाच्या लालसेने व्याकुळ झाले. सिद्धपुरुष गुरु समर्थ आडकोजी महाराजांच्या सान्निध्यात बालमाणिकाचा झालेला 'तुकड्यादास' आडकोजी महाराजांच्या जवळ पंचपदीनंतर अनेक संतांचे भजने अभंग गात असे. असाच एके दिवशी आडकोजी महाराजांजवळ बसून तो तुकोबारायांचा अभंग गात होता. शेवटी 'तुका म्हणे' गुणचंदनाचे अंगी असे गात असतांनाच आडकोजी महाराज म्हणाले 'तुका म्हणे...' तुका म्हणे ? आता 'तुकड्या म्हणे...' म्हन ! तोच तुकड्यादासाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि त्यांनी ओळखलं की गुरुरायांनी आपल्याला काव्य लेखनाची आज्ञा दिली व त्यातून त्यांची लेखनी उत्स्फुर्त काव्यरुपातून बहरत गेली. याचेच प्रमाण देतांना संत तुकडोजी महाराज म्हणतात- "गुरुदेव सद्गुरु आडकोजी ने कृपा- सिंचन किया। 'तुम भी भजन लिखते रहो' आशीष यह मुझको दिया ।। तबसे भजन - लेखन बढा, इस हाथसे सम्हले नही। गंगा प्रवाहित वाक्यरचना सहजही होती गयी।।" ( लहर की बरखा) यापुढे स्वकाव्यानुभूतीतून अंतरंगाचा व समाजाचा अज्ञानरुपी अंधार दूर करण्यासाठी ज्ञानदीप त्याच्या हृदयात धारण करत होता. दि. १५ नोव्हेंबर १९२१ रोजी कार्तिक पौर्णिमेच्या मध्यान्हास शतायुषी गुरु समर्थ आडकोजी महाराज समाधिस्त झाले तेव्हा बेचैन झालेल्या बाल तुकड्यादासाला गुरु समर्थ आडकोजी महाराजांच्या सान्निध्यकृपेने लाभलेल्या शक्ती प्रसादाने स्थिर केले. परंतु, गुरुविरहाणे शिष्य तुकड्यादासाचे मन अधिकच विरक्त झाले. त्या विरक्ती भावातच बालतुकड्यादासाने मातेला दिलेल्या वचनापोटी इयत्ता चवथी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण यावली, चांदुरबाजार व वरखेड येथे पूर्ण केले आणि व्याकुळ मनाने विनातिकीट धक्के खात पंढरपूर गाठून तिथल्या भक्त पुंडलिकाच्या आदर्शाने माता- पित्याच्या सेवेचा धर्मपाठ ग्रहन करून पुनःश्च यावलीस आले. यावलीत शिवणकाम करून माता-पित्याचा सांभाळ केला. याच काळात त्यांच्याठायी ईश्वरदर्शनोत्कंठा प्रबळ होवून सन् १९२५ साली विरक्त मनाच्या भावबंधाला मोकळी वाट देण्यासाठी बालतुकड्यादासाने घरातील शिवणयंत्र विकून दानधर्म केला आणि तपश्चर्येसाठी रामटेकच्या अरण्याची वाट धरली. पुराणातील धार्मिक समजूती प्रमाणे धृवासारखे अढळपद प्राप्त करण्यासाठी सालबर्डी (जि. बैतुल), रामटेक, नारायण टेकडी, कापुरबावडी (जि. नागपूर), रामदेगी, सातबहिणी डोंगर, ताडोबा, गोंदोडा (जि. चंद्रपूर) आदि अरण्यात हिंस्त्रश्वापदाच्या सान्निध्यात संचार करून तपसाधना केली. रामटेक अरण्यात तपश्चर्या करतांना एकेरात्री एका अज्ञात तेजोपुंज महायोग्याने बालतुकड्यादासाला स्वतःच्या योगसाधना गुफेत नेऊन त्याला हटयोगादीसह पूर्ण योग शिकविला. तपश्चर्येच्या काळात दिवसरात्र समाजनिरीक्षणासह घोर अरण्यातील पशुपक्षांच्या सान्निध्यात एकांत ध्यानसाधना व लोकांतात धर्मनिरुपण अशी लहरी दिनचर्या या बालयोग्याची सततची झाली होती. या लहरी छंदानेच नेरी भागातील भूतेश्वर मंदिरातील भोजपत्रावरील एक पुरातण अध्यात्म ग्रंथ वाचून त्यांनी आत्मस्थ केला होता. महाअरण्य ताडोबा, रामदेगी, गोंदुडा वनात खडतर तपसाधना करून अल्पावधीतच बालयोगी तुकडयाने प्रेमयोग, राजयोग, हटयोग, साम्ययोग, जीवनयोग आदि साधनानुभवातून अध्यात्मातील सर्वोच्च विश्वयोगाचे मर्म आत्मसात केले. तेथील घोर अरण्यातील आदिवासी समाजात धर्मपुरुष 'देवबाबा' या नावाने बालतुकड्यादासाने सत्कार्यज्योत प्रज्वलित केली. याच साधनाकाळात आपल्या विविध बाललिला, चमत्कारादिने 'देवबाबा' म्हणून बालतुकड्यादास सर्वत्र परिचित झाले होते. त्यांची विलक्षण दिर्घबाहू, श्यामलमुर्ती, मुद्रेवरील तेजपुंज व सात्विक भावामुळे प्रत्येक भक्तगणांच्या मनात ते एक दैवी पुरुष आहेत अशी प्रचिती झाली होती. याच दरम्यान रामटेक येथे मंडला निवासी १६० वर्षीय योगीराज स्वामी सीतारामदास महाराज यांची बाल तुकड्यादासाची भेट झाली तेव्हा तुकड्यादासाची ती विलक्षण तेजपूंज मुद्रा पाहून आपणच साक्षात प्रभू रामचंद्र आहात अशी प्रचिती स्वामीजींना झाली होती. म्हणूनच स्वामी सीतारामदास महाराज राष्ट्रसंतांना अधिकारवाणीने मेरे भगवान राम म्हणत. चिमूर, नेरी परिसरातील मुस्लिम सुफी फकीरांच्या मंत्रतंत्रादी साधनांचा फोलपणाही उघडून तत्कालीन देवभोळ्या लोकांना चिकित्सक दृष्टी प्रदान केली व अंधश्रद्धा अनिष्ठ रुढी परंपरा, कर्मकांड, यज्ञयाग आणि भोंदूसाधू यांच्या फोलपटपणावर कडा प्रहार करून त्यांनी अनिष्ट प्रथांचे, रुढ्यांचे उच्चाटन आपल्या भजनाद्वारे केले. त्यावर प्रहार करतांना ते म्हणतात- “माला कंठी भस्म लगाये, कितने साधू फिरते है। दिनभर ठगते भोली जनता, रात में चोरी करते है। यज्ञ याग में बकरा काटे, बलीवेदीपर चढता है। अच्छे अच्छे ब्राह्मण कहते, नही तो याग भी अडता है। शराब का भी तीर्थ बनाकर देवी को पिलवाते है, देवी बिचारी क्या पिवेगी? पंडा, गुंडा लेते है।" काही रुढीग्रस्त लोकांनी या बालयोग्याला विषही दिलं. ते प्राशन करून या बाल तुकड्यादासाने जगाला मात्र 'आनंदामृत' हा आध्यात्मप्रचूर ग्रंथ दिला. याचवेळी चिमूरला 'माणिक प्रासादिक बालसमाज मंडळ' जन्मास आले. त्यातूनच १९२९ साली संत तुकडोजी महाराजांची हिंदी भजनावली आदि प्राथमिक स्वरुपातील ग्रंथसंपदा प्रसिद्ध झाली. सन् १९२९-१९३० या काळात काशी, प्रयाग, हरिद्वार, पुष्कर, पशुपतीनाथ (नेपाळ) आदि दुरस्थ आणि निकटस्थ तिर्थक्षेत्रे पाहून अनुभवून सांप्रतकाळातील धर्मआध्यात्मिक धरोहरेतील संत लष्करीबाबा, वसिष्ठ महाराज, दादाजी धुनिवाले आदि अनेक संतांच्या भेटी घेऊन संत तुकडोजी महाराजांच्या आध्यात्मिक तत्वबंधांचा निकष मजबूत झाला. जुन्याच पारंपारिक धार्मिक साधनांचा अंगीकार करून बालयोगी संत तुकडोजी महाराजांनी समाजनिरीक्षण केले. जुन्याच साधनांना सहाय्यक बनवून मानव धर्मजागरणासाठी तसेच समाज उत्थानासाठी नव्या परिवर्तनशिल 'खंजिरी भजन' या प्रबोधन साधनाचा प्रयोग सुरू केला होता. या समन्वयात्मक परंतु तारतम्यदृष्टीने महाराजांकरवी समाजाला दिलेल्या एक्के, धार्मिक सप्ताह या ज्ञानचर्चादी जून्या साधनांच्या परिशिलनातून देवभक्त, देशभक्त, सुशिक्षीत, अशिक्षित, गृहस्थ, संन्यस्थ व विभिन्न धर्मपंथी लोकांना एकात्मतेचा समन्वयी समाज घडवणारा अजोड व तेवढाच प्रगतीशिल प्रशस्थ प्रबोधनमार्ग संत तुकडोजी महाराज या नावाने मिळाला होता. बालतुकड्यादासाचे अल्पवय आणि साधा वेष तरीही प्रखर अध्यात्मतेज असूनही बालकात खेळणं- पोहणं परंतु अलौकीक ऊर्ध्वदृष्टी, निरागस बालहास्य, अद्भुत योगानुभव, घोडा छकडा-सायकल मोटर आदि चालविण्यातलं चापल्य आणि ढोल- - शंख- खंजिरी - एकतारी आदि वाजविण्यातील कौशल्य त्याचबरोबर अप्रतिम प्रभावी भजन रचना आणि दिग्गज पंडितांनाही थक्क करणारी ज्ञानचर्चा अशा अद्भूत व्यक्तीमत्वामुळे निर्माण झालेल्या विलक्षण आकर्षनाने प्रचंड लोकसंग्रह साधून चैतन्याची अपूर्व लाट तत्कालीन समाजात निर्माण केली होती.. -
 
भारतावर असलेल्या ब्रिटीश सरकारच्या अमानुष गुलामगिरीला संपवून भारतवासीयांना स्वातंत्र्याची देणगी बहाल करण्यासाठी सन् १८५७ पासून ब्रिटीश विरोधी चळवळ भारतात जोर धरत होती. स्वातंत्र्यासाठीच संत तुकडोजी महाराजांनी जनजागृतीच्या कार्याची कास पूर्वीपासूनच धरली होती. त्याचाच परिपाक म्हणून १९३० सालातील वैदर्भिय गोंडवानातील सत्याग्रही शिबिरांमध्ये संत तुकडोजी महाराजांच्या 'झुठी गुलामशाही क्या डर बता रही है। जुल्मोंका खौफ देकर क्या डर बता रही हैं।।' या ओजस्वी क्रांतीप्रवण राष्ट्रीय भजनाने ब्रिटीश विरोधी विद्रोहाची अपूर्व लाट निर्माण झाली होती. त्यामुळे संत तुकडोजी महाराजांना ब्रिटीशांकरवी चिमुर येथे २७ ऑगस्ट १९३० रोजी रात्री भजनानंतर जेरबंद करण्याचा असफल प्रयत्न झाला होता व प्रस्तुत क्रांतीगीतावर ब्रिटीश सरकारद्वारा भजन बंदीचा फर्मान काढण्यात आला होता. संत तुकडोजी महाराजांच्या हृदयात राष्ट्रस्वातंत्र्याची प्रदिप्त भावना बाल्यकाळापासूनच उदयास आलेली असल्याने त्यांनी भयग्रस्त समाजाच्या न्युनगंडाला त्यागनिष्ठ बनवून प्रखर राष्ट्रवादाकडे नेण्याऱ्या क्रांतीकारी प्रबोधनाचा प्रयोग सन् १९३० च्याही आधीपासून धार्मिकसत्संग आदि साधनांद्वारे स्वकाव्य भजनादी माध्यमातून सुरु केलेला होता. ही राष्ट्रस्वातंत्र्ययुद्धाची तयारी समाजाच्या सर्वच स्तरात, सर्वांगपातळीवर भिनविण्यासाठी धार्मिक साधनांचा माध्यम म्हणून वापर करण्याची योजना संत तुकडोजी महाराजांद्वारे अधिक व्यापकतेने विदर्भ गोंडवाना, वन्हाड, तेलंगना, मध्यप्रांतादि भागात जोर धरत होती. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या ध्येयधोरणांना अधिक व्यापकता यावी व स्वातंत्र्य प्राप्तीची मनोभूमिका जनसमाजात भिनावी म्हणून लोकभावनेमध्ये असलेली धर्मश्रद्धेची, भगवद्भक्तीची पार्श्वभूमी तयार करण्याचा व त्या तयार झालेल्या भक्तीयुक्त शक्तीचा उपयोग राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात विधायक कार्याने जोडण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी आयोजित केलेल्या सन् १९३३ चा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरचा प्रथम चार्तुमास्य असामान्य व्यवस्थापन कौशल्य आणि क्रांतीप्रवण कार्याची चुणूक दाखविणारा ठरला.
 
तसेच १९३५ चा अमरावती जिल्ह्यातील सालबर्डी या तिर्थक्षेत्रातील रुद्रयाग 'न भूतो न भविष्यती' असा अभुतपूर्व नियोजनाने लक्षावधी दरिद्रय नारायणाच्या सुख-समाधानाच्यापूर्तीने सिद्धीस पावला. या कार्याने महाराजांची वाढलेली महनियता भारतातील धर्मक्षेत्रासहीत सामाजिक आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनाही मनोबल प्रदान करणारी ठरली. याच कालखंडात सन् १९३४-१९३५ सालात जनसमुहाला निट कार्यप्रवृत्त करण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीत 'गुढीपाडव्यास' दि. ४ एप्रिल १९३५ रोजी 'श्रीगुरुदेव धर्मसेवाश्रम' स्थापन केला आणि आपल्या श्रद्धाशिल प्रेमी भक्तजनांकडून वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) या गांवी श्रीगुरुदेव आरती मंडळाची स्थापना करून शिस्तबध्द व स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावणाऱ्या देवभक्त तथा देशभक्त युवकांची मजबूत संघटना निर्माण केली. महात्मा गांधीजींच्या संपर्क क्षेत्राशी संत तुकडोजी महाराजांचा याआधीच परिचय घनिष्ट झालेला होता. खुद्द महात्मा गांधीनांही महाराजांच्या या दैवी परंतु राष्ट्रीय कार्याच्या व्यापकतेची जाणीव झालेली होती. संत तुकडोजी महाराजांच्या या व्यापक जनोद्धाराच्या चळवळीचा समाजातील काही तथाकथीत द्वेषी सुधारणावाद्यांनी धसका घेऊन संत तुकडोजी महाराजांना बदनाम करण्याचा चंगच बांधला होता. या द्वेषीमनोवृत्तीतूनच सालबर्डीच्या रुद्रयागाचा संदर्भ जोडून संत तुकडोजी महाराजांप्रती महात्मा गांधीची भावना कलूशीत व्हावी या उद्देशाने खुद्द गांधीर्जीकडेच काही लोकांनी कागाडी केली होती. पुढे ३० मार्च १९३६ रोजी नागपूर स्थित गणपतराव टिकेकर यांच्या निवासस्थानी संत तुकडोजी महाराजांची महात्मा गांधीशी प्रथम भेट झाली. त्यावेळी 'उँचा मकान तेरा कैसी मजल चढूँ मैं।' आणि 'किस्मतसे राम मिला जिनको उसने यह तिन जगह पायी' ही महाराजांची दोन भजन ऐकताच भाव समाधीत लिन होऊनही गांधीजींना आपल्या मौनाचे देखील भान राहिले नाही आणि त्यांचे मौन सुटले.
 
संत तुकडोजी महाराजांच्या व्यापक कार्याची महनीयता जाणून महात्मा गांधींनी संत तुकडोजी महाराजांना सेवाग्राम आश्रमात साग्रह दि. १३ जुलै ते १३ ऑगस्ट १९३६ पर्यंत एक महिना ठेऊन घेतले. याच दरम्यान अनेक राजनेत्यांना संत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा परिचय झाला व त्याचबरोबर त्यांच्या सिद्ध साधनांचा व परमोच्च आध्यात्मिक अनुभवातील सामाजिक, राष्ट्रीय तथा वैश्विक मानवतेच्या तत्वज्ञानाची अनुभूती महात्मा गांधींना आली त्यामुळेच संत तुकडोजी महाराजांच्या भजनातील अधिकार वाणीने खुद्द महात्मा गांधींनाही मौन सोडावयास भाग पाडले होते. महात्मा गांधी संत तुकडोजी महाराजांचा अधिकार जाणून होते. सन् १९३८ पूर्वी पासूनच संत तुकडोजी महाराजांनी आयुर्वेदाचा प्रचार व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून शेकडो वैद्य निर्माण केले आणि गावा-गावात रुग्णसेवेचे कार्य केले. पुढे गुरुकुंज आश्रमात धमार्थ रुग्णालयाची स्थापना करून आणि त्याचबरोबर विविध औषधे निर्मिती व अनुसंधानाकरिता 'श्रीगुरुदेव रसशाळेची' निर्मिती केली आणि त्याचबरोबर श्रीगुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली. नागठाणा, जि. बैतुल (म.प्र.) येथे दि. ५ सप्टेंबर ते ११ ऑक्टोंबर १९३८ दरम्यान भव्य चातुर्मास्य चे आयोजन करून राष्ट्रीय जनजागृती, अध्यात्म, व्यायाम, आयुर्वेद आदिचे प्रशिक्षण देण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतसेवा दल, कुस्तीगीरांचे आखाडे आदि संस्थांमध्ये जाऊन 'जाग उठो बालविरों, अब तुम्हारी बारी है' अशी प्रेरणादायी ललकारी संत तुकडोजी महाराजांनी दिली होती. १९४२ ला तर युवकांचा स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग गुरुकुंज आश्रमात महाराजांनी घेतला होता.
 
राष्ट्रीयतेची शिक्षादीक्षा समाजाला देणे हे जणू संत तुकडोजी महाराजांचे जिवितब्रिद झाले होते. याचवेळी सन् १९४२ ची 'छोडो भारत चळवळ' जोर धरत होती. त्याच वेळी संत तुकडोजी महाराजांचा राष्ट्रीय जनजागरणाचा दौरा जोर धरत होता. विदर्भ, तेलंगणा, मध्यप्रांत आदि भागात संत तुकडोजी महाराजांच्या भजनांनी क्रांतीगीताचे स्वरुप धारण केले होते. ब्रिटीश हुकुमतीचे पाळेमुळे उलथवून टाकण्याचा प्रचंड क्रांती संग्राम संत तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने संचारित झालेला होता. १६ ऑगस्ट १९४२ या दिवशी एकत्रितपणे आष्टी, चिमूर, बेनोडा, यावली, चंद्रपूर सहीत मध्यभारतातील अनेक महत्वपूर्ण ठिकाणी ब्रिटीशसत्तेविरुद्ध उठाव झाले होते. 'अब काहेको धुम मचाते हो दुखवाकर भारत सारे, आते है नाथ हमारे झाड झडूले शस्त्र बनेंगे, भक्त बनेंगी सेना। पत्थर सारे बॉम्ब बनेंगे नाव लगेगी किनारे।।' हे क्रांतीगीत गावागावात क्रांतीचे स्फुरण चढवित होते. या सहीत 'चेत रहा है भारत दुखसे, आग बुझाना मुश्किल है। कहाँतक समझाये तुझको अब समझाना मुश्किल है।।' आणि "उठो जवानों करके बताओ, कहनें के दिन गये ।। " या संत तुकडोजी महाराजांच्या क्रांतीकारी भजनाने राष्ट्रस्वातंत्र्याच्या 'छोडो 'भारत' चळवळीच्या उठावाची ठिणगी पडून जनसमाजात स्वातंत्र्य प्राप्तीचा ब्रिटीश सत्तेविरुद्धचा वनवा पेटला होता. त्यामुळेच ब्रिटीशसत्तेने संत तुकडोजी महाराजांना सन् १९४२ च्या 'छोडो भारत' आंदोलनातील क्रांतीकारकांचा 'क्रांतीप्रणेता' म्हणून दि. २८ ऑगस्ट १९४२ रोजी चंद्रपूर येथून पहाटे ४ वाजता धारा २६ (१) डिटेन्शन अॅक्टनुसार अटक केली व नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात बंदी क्र. ७७४ व खोली क्र. १ मध्ये दि. २१ सप्टेंबर १९४२ पर्यंत स्थानबद्ध केले. त्या दरम्यान संत तुकडोजी महाराजांच्या सुटकेसंबंधी सर्व धर्म, पंथ, पक्षाचा जनाक्रोशाचा उद्रेक पाहून ब्रिटीश सरकारने गुपचुपपणे रात्रीचे १.३० वाजता नागपूर मध्यवर्ती कारागृहातून रायपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानांतरण केले. त्यानंतर संत तुकडोजी महाराजांना दि. २१ सप्टेंबर १९४२ रोजी रायपूरच्या तुरुंगात (बंदी क्र. ४९७) चार महिने पर्यंत ठेवले. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रनी राष्ट्रनेत्यांशी संत तुकडोजी महाराजांचा परिचय या ओघानेच १९३६ पासून जुळून आला होता. त्याची पूर्णता म्हणून भारतातील सर्व स्तरातील राष्ट्रनेत्यांनी संत तुकडोजी महाराजांप्रती 'क्रांतीकारी संत' म्हणून पाहिले होते. तेवढेच अनुभवलेही होते. या आधारानेच १९४२ च्या 'छोडो भारत' चळवळीतील संत तुकडोजी महाराजांच्या क्रांतीकार्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्याची नोंद भारतातील सर्व स्तरातील गणमान्य धुरीणांसहीत आम जनतेनेही घेतली होती. त्यामुळेच संत तुकडोजी महाराज तुरुंगात असतांना त्यांच्या अलौकिक जीवनवृत्तीचा आदर्श समाजात रुजल्याने या धर्मपुरुषाला मुक्त करण्याची एकमुखाने मागणी लक्षावधी लोकांनी सह्यांच्या निवेदनासहीत व धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय विचाराच्या नेत्यांनी जनआंदोलनाद्वारे ब्रिटीश सत्तेला केली होती. त्यानंतर ब्रिटीश सरकारने २९/११/१९४२ च्या आदेश क्रमांक डी.वो. एन.सी. १९१-९६६ दि. २ डिसेंबर १९४२ ला वर्धा आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यामध्ये प्रवेश बंदीचा आदेश पारित करून सशर्त संत तुकडोजी महाराजांची सुटका करण्यात आली. तुरुंगातून मुक्त झाल्यावर नेताविहीन भयग्रस्त जनतेला महाराजांनी प्रेरित करण्यासाठी भारतव्यापी विश्वशांती नामसप्ताह गाजवून जनसमाजात नवजीवन उत्पन्न केलं होतं.
 
सर्वांगीण मानवधर्माची शिकवण स्थिर करण्यासाठी संत तुकडोजी महाराजांनी सन् ११ नोव्हेंबर १९४३ मध्ये श्रीगुरुदेव आरती मंडळाच्या शाखांचा विलय करुन श्रीगुरुदेव सेवामंडळ नावाने पुनरुज्जीवन केलं. तद्वतच श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या नियंत्रणात 'श्रीगुरुदेव मासिक' व प्रकाशन विभागाची स्थापना केली. त्याचवेळी अकोला चार्तुमास्यात शेकडो प्रचारक निर्माण करून गावो-गावी श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या हजारो शाखा स्थापित केल्या आणि त्याद्वारे वैश्विक मानवतेच्या तत्वज्ञानाचा नियमबद्ध व नियोजित आदेशाचा शंखनाद केला व पुढे सन् १९५१ मध्ये श्रीगुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रम ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली. गावोगावी प्रचार प्रशिक्षणाबरोबर ग्रामीण उद्योगवर्ग, व्यायामवर्ग, आयुर्वेदवर्ग, महिलोन्नतीवर्ग, रामधून, सामुदायिक प्रार्थना, पंचमहोत्सव, यात्राशुद्धी, बलिदानबंदी, व्यसननिर्मुलन, गोवंशरक्षण, विवाहसुधार, सहभोजन, कुस्तीस्पर्धा, भजनस्पर्धा आदि उपक्रमांची प्रभावी लाट निर्माण केली आणि केंद्र-तालुका-जिल्हा प्रांत कार्यालय उघडून प्रचारकांची सक्षम साखळी गुंफली. सन् १९४५ साली संत तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वाने अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद गाजविली आणि नागपूर आखाडा संघटनेचं समन्वय घडविण्याचं दुष्करकार्य केलं.
 
१९४६ साली वरखेडच्या मंदिरापासून शुद्रादीशुद्र अस्पृश्य समाजाला मंदिर प्रवेश देण्यासाठी मंदिर प्रवेशाची लाट उठविली. याचाच परिपाक म्हणून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना असलेल्या प्रवेश बंदीला मोडीत काढण्यासाठी साने गुरुजींद्वारे आयोजित केलेल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहात गांधीजींच्या सानुग्रहाणे सुरू असलेल्या परंतु गांधीजींच्याच सल्ल्याने साने गुरुजीद्वारे स्थगीत होवू घातलेल्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाला संत तुकडोजी महाराजांनी पंढरपूर क्षेत्री जाऊन श्रीगुरुदेव सेवामंडळद्वारे नव चेतना भरली व धर्ममार्तंडांच्या हेकेखोर वृत्तीला तत्वज्ञानाच्या व स्वत:कडे असलेल्या संतत्वाच्या अतुल्य अधिकाराने विरोध करून व प्रसंगी स्वअस्थित्वाच्या धर्म अधिकाराने नमवून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रवेशबंदीला खुले करण्याचे 'पतितपावन दीनदयाघन दर्शन देने खडा, पुजारी क्यों दरवाजे अडा।' अशा कठोर शब्दात धर्ममार्तंडांणा ठणकावून मंदिर प्रवेशाचे दुष्करकार्य घडवून आणले आणि साने गुरुजींचा मंदिर प्रवेशाचा मार्ग दि.१० मे १९४३ रोजी मोकळा केला. दि. १५ ऑगस्ट १९४७ या स्वातंत्र्य दिनी संत तुकडोजी महाराजांनी जतसंस्थान येथे ध्वजारोहण करून 'या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरची असा दे।' हे नवराष्ट्र निर्मितीचे भजन लिहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. भारत स्वतंत्र झाला परंतु अखंड भारताचे धर्मभाषाप्रांत या आधाराने विभाजन होवून भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे उदयास आली होती. हैद्राबादचा निझाम हैद्राबाद राज्य पाकिस्तानात विलीन करण्याच्या मनसुभ्यात होता. त्याचे हे धोरण सरदार पटेलांनी ओळखले होते. म्हणूनच भारतीय फौजा हैद्राबाद प्रांतात पोहचत होत्या. या सर्व घडामोडीला वेगळे वळन देण्यासाठी निझामाने कासिम रिझवी या माथेफिरू नेत्याच्या द्वारे रझाकार जीहादी ही संघटना निर्माण करून संघटनेतील गुंड प्रवृत्तीच्या लोकांद्वारे हैद्राबाद संस्थांनातील मुस्लिमेत्तर हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार करण्यात येत होते. या अत्याचाराचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रसंतांनी निझामाला समजूतदारीचे पत्र पाठविले होते. तरीही निझाम समझेना म्हणून महाराजांच्या प्रेरणेने श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे रझाकार प्रतिकार मंडळ स्थापन करून प्रचारकांच्याकरवी हैद्राबाद प्रांतात व्यायाम शिबिरे घेऊन बहुजन तरूणांना रझाकारांच्या प्रतिकारार्थ शस्त्रसज्ज करण्यात आले होते. पुढे हैद्राबादसह निझाम स्टेट भारतात विलिन झाले. त्याचप्रमाणे छत्रपतींचा पुण्यशिल वारसा असलेले कोल्हापूर संस्थानचे अधिपती सर शहाजी राजे भोसले स्वतंत्र राहण्यास इच्छूक होते. भारतातील तत्कालीन नेतेमंडळींनी सरशहाजीराजेंचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला होता परंतु प्रत्यक्षात कोल्हापूर संस्थांनासंदर्भात संवाद साधण्याची तयारी होत नव्हती. अशावेळी दिल्लीच्या नेत्यांनी, विशेषता प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांनी संत श्री तुकडोजी महाराजांना कोल्हापूर प्रकरणात मध्यस्थि करण्याची विनंती केली. संत तुकडोजी महाराजांनी अखंड भारताच्या स्वप्नासाठी कोल्हापूर प्रांतात प्रचार दौरा केला.
 
कोल्हापूर येथे खासबाग मैदानावरील राष्ट्रसंतांच्या भजनाला प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांचे वंशज सरशहाजीराजे हजर होते. महाराजांच्या विचाराने प्रभावित होवून दुसऱ्या दिवशी छत्रपतींनी कोल्हापूरविषयी संत तुकडोजी महाराजांशी चर्चा करुन कोल्हापूर प्रांत भारतात विलिन करण्याचे अभिवचन दिले. कोल्हापूर संस्थान भारतात विलीन होण्याची पार्श्वभूमी तयार झाल्याचे सुतोवाच दिल्लीच्या नेत्यांना कळताच पुढे कोल्हापूर स्वतंत्र भारतात विलिन झाले. संत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या सर्व घडामोडींचे चिंतन करत होते. नव्यानेच उदयास आलेल्या भारताला लाभलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्याच्या उद्देशाने संत तुकडोजी महाराजांचे प्रचारनियोजन, अनिष्ट रुढी उच्चाटन व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक असणारे तत्वज्ञान अधिक जोमाने प्रचारित होत होते. लक्षावधी जनसमुदायाच्या समोर भजनादि माध्यमाने राष्ट्रभक्तीची तसेच मानवोद्धाराची जनजागृती संत तुकडोजी महाराज आसेतुहिमाचल अहोरात्र फिरून करत होते. स्वराज्य व सुराज्याचा मूलमंत्र ग्रामोद्धारातच आहे हा संदेश सर्वकष कार्यक्रम देशभर आयोजित करून राबविण्याचे महतदुष्कर कार्य सेवा सप्ताह, स्वच्छता सप्ताह, स्वावलंबन सप्ताह, नवनिर्माण सप्ताह, राष्ट्रीय एकात्मता सप्ताह, श्रमदान, राष्ट्रधर्म प्रचार जनजागृती यात्रा, ग्रामनिर्माणपर्वादी धार्मिक, सामाजिक समन्वयात्मक सलोख्याच्या कार्यक्रमांद्वारे सिद्धीस पावले होते. नागपूर येथे दि. २६ जानेवारी १९४८ रोजी कस्तुरचंद पार्कमध्ये पोलीस परेड प्रसंगी संत तुकडोजी महाराजांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती त्यावेळी भारताचे तत्कालीन गव्हर्नरल लॉर्ड माऊंटबेटन यांच्याशी भेट झाली. ३० जानेवारी १९४८ साली राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या निवार्णानंतर देशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीला स्थिर करून जनसमाजात व्यापक आचार प्राबल्य देण्याचे काम संत तुकडोजी महाराजांद्वारे झाले. महात्मा गांधींच्या निर्वाणामुळे निर्माण झालेल्या पोकळीने आपसुकच राष्ट्रनेत्यांच्या निराश मनोधारणेला संघटीत व प्रेरित करण्याचे मार्गदर्शन प्रचुरकार्य संत तुकडोजी महाराजांना करावे लागले. याच अनुषंगाने सन १९४८ च्या सेवाग्राममधील देशविदेशातील शांतीदूतांच्या संमेलनाला संबोधित करण्यासाठी संत तुकडोजी महाराजांना दिल्लीच्या नेत्यांनी पाचरण केले आणि महाराजांचं कार्य अधिक चौफेर आणि व्यापक होवून वैश्विक झाले. या कार्याची सुत्रबद्धताही सहज अवलोकन केल्यास संत तुकडोजी महाराजांच्या भ्रमणतीचा आलेख निदर्शनास येतो. हरिद्वार येथे १० व ११ एप्रिल १९५० साली राष्ट्रसंतांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय गो-सेवा संमेलनाचे आयोजन करून गो-संवर्धनाचे त्याचप्रमाणे गो-हत्या बंदीबाबत जनजागृतीचे कार्य या माध्यमातून केले होते. तसेच यापूर्वी १९४७ साली भारतीय घटना समितीला गोहत्या बंदीचा कायदा बनावा यासाठी विशेष निवेदन सुद्धा दिले होते आणि गुरुकुंज आश्रमात आदर्श गौरक्षणाची निर्मिती केली. महाराष्ट्रीय व्यापारी संमेलन, अ.भा. राष्ट्रभाषा प्रचार संमेलन, समाजसेवी संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, अ. भा. नशाबंदी संमेलन, हरिजन संमेलन, भारत सेवक समाज संमेलन, जमियते उल्माय हिंद परिषद, जैन संमेलन, शिख संमेलन, श्रीगुरुदेव महिला सर्वांगिण शिक्षण वर्ग, वारकरी परिषद, अ.भा. आयुर्वेद संमेलन, संस्कृत साहित्य संमेलन (दिल्ली), जीवदया संमेलन (मुंबई), सर्व सेवासंघ संमेलन अशी शेकडो संमेलने संत तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनानं गाजविली. पंजाब प्रांतातील वेदांत परिषद, दिल्लीची युनोस्को परिषद, अणुव्रत परिषद, नागपूरची महाराष्ट्र मुद्रण परिषद, अमरावतीची महागाई परिषद किंबहुना गोंदियाची तमाशा परिषद सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वानं दिपून गेली. आदिवासी युवक प्रशिक्षण, ग्रामसहाय्यक प्रशिक्षण, कुष्ठरोग निवारण, दाईवर्ग, अ.भा. आयुर्वेद महासंमेलन आदि असंख्य योजनांना त्यांनी आश्रय दिला. शिख संमेलन, वीरशैव संमेलन, पारशी समाजाचा महोत्सव, राज्यपाल डॉ. चेरियन यांचा ख्रिस्ती धर्माचा उत्सव, भंडाऱ्याच्या अवलिया बाबांचा मुस्लिम उत्सव अशा सर्वातच ते समप्रेमाने संमिलित झाले. स्वतंत्र झालेल्या भारताला सुराज्याच्या सुत्रात गुंफण्याचा कार्यप्रयोग संत तुकडोजी महाराजांच्या भजन- भाषणादी तसेच लेखनादि कार्याने सतत सुरु होता.
 
भारत देश, पाकिस्तान निर्मितीनंतर सांप्रदायिक स्थित्यंतरातून पुढे वाटचाल करित होता. भारतात निर्माण झालेली ही सांप्रदायिकतेची आग शांत करण्यासाठी संत तुकडोजी महाराजांची वाणी निरंतर गर्जत होती. आसेतुहिमाचल संत तुकडोजी महाराज हजारो मैलाचा प्रवास करून क्रुध्द झालेल्या जनतेला शांत करून एक दिलाने जगण्यासाठी व राष्ट्राच्या एकात्मतेसाठी प्रेरित करत होते. ग्राम विकास, सामाजिक शिक्षा विकास, युवा चेतना विकास, महिला सक्षमिकरण आदि शिबिरांच्या माध्यमातून संत तुकडोजी महाराजांचे कार्य अधिक व्यापक व चौफेर विस्तारत होते. याच कार्याचा अनुनय म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधीना कार्यरुपाने श्रद्धासुमन अर्पित करण्याचा व त्यांच्या त्यागमय जीवनाचा राष्ट्रीय आलेख जनसमाजात प्रेरित करण्याचा अखिल भारतीय स्तरावरील प्रयत्न व्हावा या दृष्टीने संत तुकडोजी महाराजांच्या पुढाकाराने राष्ट्रपिता महात्मा गांधीचा प्रथम पुण्यस्मरण (गांधी स्मृतिदिन) गुरुकुंज आश्रम येथे आयोजित करण्याचे निश्चित झाले. गुरुकुंज आश्रम येथे ३० जानेवारी १९४९ ला भारताचे तत्कालीन राष्ट्रपती (भारतीय राज्य घटना समितीचे सभापती) डॉ. राजेंद्र प्रसाद व दिल्लीतील गणमान्य नेत्यांच्या तसेच पुढाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम गांधी स्मृतिदिनाचे रितसर उद्घाटन झाले. भव्य सूत्रयज्ञ, ग्रामसफाई, अस्पृश्यता निवारण, खादी प्रचार, चरखा सम्मेलन, शांती संम्मेलन आणि विशाल प्रार्थना सभेचे आयोजन सदर कार्यक्रमात करण्यात आले होते. लक्षावधी भारतीय समाजबांधवांचा मेळा गुरुकुंज नगरीत लक्ष वेधून घेणारा ठरला होता. याच कार्यक्रमात डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी महाराजांना आपल्या भाषणात 'राष्ट्रसंत' या उपाधीयुक्त संबोधनाने सन्मानित केले होते. त्या क्षणापासून संत तुकडोजी महाराजांना संबंध भारतभर 'राष्ट्रसंत' म्हणून ओळखले गेले. स्वतंत्र भारतातील, महाराष्ट्र प्रांतातील, अमरावती जिल्ह्यातील, यावली नामक छोट्याश्या खेड्यात जन्मलेले 'माणिक' गुरुगृही झालेले 'तुकडोजी' आता भारताचे पहिले 'राष्ट्रसंत' म्हणून सुशोभित झालेले होते. खऱ्या अर्थाने संत तुकडोजी महाराज राष्ट्राचे 'राष्ट्रसंत' झाले होते. भारतीय धर्मक्षेत्रासह अध्यात्म क्षेत्रातील क्षितीजाला आपल्या अनुभवजन्य तसेच सत्कर्मप्रामण्ययुक्त ज्ञानाने गवसणी घालणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लक्षावधी साधुसंतांचे, पिरवलिचे, देशसुधारक लोकांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उदयास आले होते.
 
राष्ट्रसंतांच्या या अतिउच्चतम कर्मयुक्त प्रज्ञेचा प्रभाव संबंध भारतभर सूर्याच्या आलोकाप्रमाणे प्रचारित झाला होता. भारतातील कोट्यावधी जनतेचे हृदयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ईश्वरनिष्ठ प्रतिमा निर्माण झाली होती. याच दरम्यान पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्ताने दि. १७ जुलै १९५१, दि. ०५ जुलै १९५२ आणि दि. २४ जुलै १९५३ या तिन वर्षात 'संत संमेलनाचे' महाराजांद्वारा यशस्वी आयोजन करण्यात आले होते. सन् १९५१-१९५२ सालात अमेरिकेचे विश्वधर्म परिषदेचे निमंत्रण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना येऊन गेले होते. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसमोर भारतातच सुधारणावादी कामांचा खच्चून खच पडलेला होता त्यामुळे अमेरिकेच्या विश्वधर्म परिषदेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जाता आले नाही. पुढे विनोबा भावे यांचेद्वारे भारतात भूदान यज्ञ चळवळीला प्रारंभ झाला. राष्ट्रसंतांना क्षणाचीही उसंत नसतांनाही विनोबांनी केलेल्या विनंतीला मान म्हणून भूदान चळवळीला समर्थन दिले तसेच अकरा दिवसात अकरा हजार एकर भूमी महाराजांनी यवतमाळ जिल्ह्यातून भूदानात मिळवून दिली. हे भूदान चळवळीतील ऐतिहासिक पर्वच होते. हजारो मैलाचा तुफानी प्रवास करून लक्षावधी लोकांच्या जीवनात मानवता, राष्ट्रीयता, बंधुभावना, समानता, समाजशिक्षण आदि सुधारणावादी विचारांच रोपण महाराजांद्वारे अव्याहत चालू होते. शारीरिक श्रमाची कुठलीही तमा न पाळता १०३ डिग्री ज्वरातही हजारो मैलाचा प्रवास करून लाखो दीनदुबळ्या लोकांच्या जीवनाला संजीवन देण्याचं कार्य अभूतपूर्वच आहे. तथागत बुद्धाच्या अडीचहजाराव्या जयंती निमित्त एक कोटी तासाचा समयदान यज्ञ संकल्प कार्यक्रमाचे आयोजन करून १०० गावांमध्ये बंधारे, शोषकुप, श्रमदानाने रस्ते, गरीबांचे घरे, शोषखड्डे आदि निर्माण करून भगवान तथागत बुद्धाला सक्रीय श्रद्धांजली अर्पण करण्याचे महत् कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांद्वारा संपन्न झाले. पुढे सन् १९५५ साली जापानच्या पंचम विश्वधर्म परिषदेच्या निमंत्रणाचा स्विकार महाराजांनी केला व जापानला जाऊन तेथील विश्वधर्म व विश्वशांती परिषदेचे उद्घाटन आपल्या स्वरचित 'हर देश में तु हर भेष में तू, तेरे नाम अनेक तु एकही है।' आणि 'ऐ विश्वके चालक प्रभो, मुझमें समझ दे विश्वकी ।।' या भजनांनी केले होते. या परिषदेत भारतीय राजदूतांकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे दुभाषी म्हणून शिवचरणसिंग शिरीक यांनी संपूर्ण कार्य पाहले. आपल्या अगम्य अविचल परमज्ञानाच्या शब्दवाणीउर्जेने जगाला चकित केले. त्याच विश्वधर्म परिषदेत अठरा राष्ट्राच्या धर्मसल्लागार समितीत एकमताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एक प्रकारे हा भारतीय अध्यात्माचा सूर्योदय पूर्वेकडील व पश्चिमेकडील राष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वरुपाने झाला होता. विभिन्न स्तरातील शेकडो सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, धार्मिक आदि संमेलने त्यांनी वैशिष्टयपूर्ण मार्गदर्शनाने गाजविली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अधिवेशनात प्रमुख मार्गदर्शन केले. राष्ट्रसंत आपल्या अविश्रांत दौन्यात व्यस्त असतांनाच त्यांनी मानवाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने 'ग्रामगीता' या युगग्रंथाचे लेखन केले व २५ डिसेंबर १९५५ ला तुमसर येथे आयोजित १८ वे विदर्भ साहित्य संमेलनात 'ग्रामगीतेचे' प्रकाशन झाले. याचवेळी एक हजार गावात एकाच दिवशी विविध विधायक कार्यक्रमाद्वारे ग्रामगीतेचा प्रकाशन सोहळा पार पडला. असंख्य सरकारी जनकल्याणाच्या योजनांना आश्रय दिला. नाग विदर्भ, गोंडवाना आणि मराठवाडा विभागात येऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी नवनिर्माणाची अपूर्व लाट उठविली, जी पाहून केंद्रीय मंत्रीही थक्क झाले. इंदूर, कोल्हापूर, औंध, जत आदि संस्थानांमध्ये त्यांनी प्रजाहितैषी राष्ट्रीयतेला बळ दिलं ! चंद्रपूर. गडचिरोली प्रांतातील अहेरी संस्थानांतील आदिवासींना जवळ करून त्यांच्यात सुधारणावादी विधायक कार्याला सुरुवात केली. तसेच पंजाब, बिहार नि उत्तर प्रदेश ते म्हैसूर हा भूभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी खंजरी भजनाने जागविला.
 
भारत सेवक समाज संघटनेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून संस्थापकीय सदस्य म्हणून राहिले. दि. १९ फेब्रुवारी १९५६ दिल्ली येथील बिर्ला भवनात भारत साधुसमाजाची स्थापना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांद्वारा अनेक साधुसंतांच्या व महात्म्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आणि प्रथम संस्थापकीय अध्यक्ष म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची नियुक्ती तेथे उपस्थित साधुसंतांकडून एकमताने झाली. त्यात महामंडलेश्वर स्वामी सर्वानंद, स्वामी रामानंदतिर्थ, श्रीस्वामी अखंडानंदजी, स्वामी हरिनारायणानंदजी, स्वामी शुकदेवानंदजी व केंद्रीय मंत्री गुलजारीलाल नंदा व अनेक साधु-संत उपस्थित होते. सन् १९५६ मध्ये अमेरिकेचे कृषि नेते जॉर्ज विल्सन व टेक्निकल को. ऑप मिशनचे अधिकारी यांनी गुरुकुंज आश्रमातील कृषि विभागाचे निरिक्षण करून ग्रामगीतेच्या माध्यमातून चाललेल्या सेंद्रीय शेतीचे अवलोकन करून गौरवोद्गार काढले. विनोबाद्वारा आयोजित भूदान चळवळीत चक्रव्युवहात सापडलेल्या विनोबांना त्यांच्या विनंतीवरून महाराजांनी यवतमाळ जिल्ह्यात ११ दिवसात ११ हजार एक्कर भूमि भूदानात मिळवून दिली होती. त्याचाच भूदान पुर्ति समारोह दि. १८ एप्रिल १९५९ मध्ये यवतमाळ येथे ३४ कलम ग्राऊंडवर पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू द्वारा आयोजित करण्यात आला त्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भूदानास दिलेला अभुतपूर्व सहयोग दिल्याबद्दल शतशः आभार पंडीत नेहरूद्वारा व्यक्त करण्यात आले होते. सन् १९६२ सालात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नवसमाजनिर्मितीच्या कार्याचा ओघ सतत झंझावताप्रमाणे भारतभर संचारित होत होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उत्कट राष्ट्रभक्तीचे तत्त्वज्ञान भारताला नवउर्जा देणारे ठरत होते. पुढे सन् १९६२ मध्ये अरुणाचलच्या नेफा आदि भागातून चिनने भारतावर आक्रमण केलेले होते त्यावेळी भारतीय सैनिकांजवळ शस्त्रास्त्र व दारूगोळ्याची कमतरता होती. त्यातच भारत युद्धाच्या मनस्थितीत नव्हता. अशावेळी भारतीय सैनिकांचे मनोबल हतप्रभ झाले होते. भारताचा पूर्वांचल भाग युद्धाच्या खाईत लोटला गेला होता. या संकटाच्यावेळी भयग्रस्त झालेल्या भारतीय सैनिकांसहीत प्रत्यक्ष युद्धभूमिशी निगडीत जनतेमध्ये मनोबल व आत्मबलाची तसेच राष्ट्रीय अस्मितेची जागृती करणे गरजेचे होते. या बिकट प्रसंगी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जनतेला राष्ट्रतेजाची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भारतीय सरकारचे रक्षामंत्री यशवंतराव चव्हाण व प्रधानमंत्री पं. जवाहरलाल नेहरू यांनी दिल्लीला पाचारण केले.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारतावरील या संकटाला सावरण्यासाठी युद्धभूमीवर प्रत्यक्ष सहभाग घेऊन भजन भाषणातील ओजस्वी राष्ट्रीय वाणीने 'आओ चिनीयो मैदान में, देखो हिंद का हाथ । तैयार हुआ हिंद तुम्हारे साथ ।।' अशी रणगर्जना केली. त्यामुळे भारतीय सैन्याचे राष्ट्रनिष्ट मनोबल वाढवून चिनला योग्य ते प्रतिउत्तर देण्यात आले. दि. ३० ऑगस्ट १९६४ साली मुंबई येथील सांदीपणी आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी, श्री शि. श. आपटे, श्री मास्टर तारासिंह, स्वामी श्री चिन्मयानंद, कांचीपीठाचे श्री शंकराचार्य तसेच भारताच्या धर्मप्रातांतील प्रमुख संत मंडळींच्या उपस्थितीत विश्वहिंदू परिषदेची संस्थापना करण्यात आली. मानवतेच्या व्यापक उद्देशासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे तत्त्वकार्य असल्याने महाराजांनी विविध धर्माच्या धर्मसंघटनांना सदैव मार्गदर्शन केले. त्यामुळे हिंदू-मुस्लिम-शिख-ईसाई बुद्ध पारशी जैन आदि सर्वच धर्म संस्थांना राष्ट्रसंतांचे प्रेम समपातळीने प्राप्त झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या व्यापक मानवोद्धाराच्या वैश्विकतेसाठी सर्वच स्तरातून सहकार्यही मिळाले. या कार्यासहीतच राष्ट्रावरती आलेल्या सन् १९६२ च्या चिनच्या आक्रमणाच्या संकटासारखेच राष्ट्रीय संकट सन् १९६५ च्या पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणवेळी ओढवले होते. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी उत्तर भारतातील युद्धभूमीवर लाहोर सेक्टरवर जाऊन पाकिस्तान विरोधी भूमिका घेऊन सैनिकांचे मनोबल वाढविणारे दौरे केले होते. त्यावेळी 'मेरे प्यारे सुंदर भारतपर दुश्मन की नजर ना लगे, अरे तू सुन' या भजनाद्वारे व भाषणातील राष्ट्रधर्माने प्रेरित असलेल्या वाणीने सैन्यासहित जनतेलाही राष्ट्रसुरक्षेसाठी प्रेरित केलेले होते. जखमी झालेल्या सैनिकांच्या सुश्रूषेसाठी व मदतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याद्वारे राष्ट्र संरक्षण निधी संकलन योजना कार्यान्वित झाली होती.
 
देशभरातील महाराजांच्या भजनाच्या कार्यक्रमातील उपस्थितीत लक्षावधी जनतेकडून लक्षावधी रुपयांचा निधी तसेच स्वतः रक्तदान करून सेवामंडळाच्या शाखेद्वारे हजारो बॉटल रक्त संकलित करून युद्धभूमीवरील जखमी सैनिकांसाठी पाठविण्यात आले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या अद्भूत राष्ट्रभक्तीला भारताच्या इतिहासात त्यामुळेच तोड नाही. या कार्याची दखल दस्तुरखुद्द देशाच्या तत्कालीन सरकारला व महनीय राष्ट्रपुढाऱ्यांनाही घ्यावी लागली. पुढे तर 'उणे दिसे ते पूर्ण करी । जगाचा तोल बोधे सावरी' या ग्रामगीतेच्या ओवीसूत्रानुसार शासनाच्या समाज शिक्षण, परिवार नियोजन, नशाबंदी आदि योजनांमध्ये राष्ट्रसंतांनी प्राण ओतला. गुलजारीलाल नंदाजींचा 'भारत सेवक समाज' किंवा पं. जवाहरलालजींची 'राष्ट्रीय एकात्मता समिती' अशा सर्व उत्तम कार्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी स्वसामर्थ्य दिले. त्यांचा आवाकाही विलक्षण! आपला जन्मदिन करू इच्छिणाऱ्यांना 'ग्रामजयंती' साठी प्रवृत्त करून राष्ट्रपती समोर पाचशे चरख्यांचा सूतयज्ञ करून दाखविला ! सततच्या कार्यव्यस्त प्रवासातच सुमारे १०५ च्या वर हिंदी मराठी गद्यपद्य ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले आणि अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वाटचालीस बळ दिले. राष्ट्रसंतांचा ग्रामातील दरिद्री माणसापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत खंजेरी या स्वसामर्थ्ययुक्त भजनमाध्यमाने केलेला प्रवास अफलातून आहे. वेळ पडली तर जनतेच्या सुखसमाधानाकडे डोळेझाक करणाऱ्या सरकारसहीत, नेते पुढाऱ्यांनाही 'बिगड गयी शासन की रिती, साम-दाम-दंडन की नीती' असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ठणकावून सांगितलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सबंध जीवनप्रवासात धर्म, अध्यात्म, समाज, साहित्य, ग्रामसुधार, राष्ट्रसुधार, वैश्विक बंधुभाव ते मानवता या सर्व विषयांचा अंतर्भाव आलेला आहे. त्यांचा जीवनप्रवास जेवढा झंझावती तेवढाच मृतव्रत झालेल्या वैश्विक मानवी समाजाला संजीवन प्रदान करणारा आहे.
 
सत्य-अहिंसा, सत्याग्रह आणि कृतीशील क्रांती आदि वैचारिक स्तरातील राष्ट्रसंतांची शालिनता ही तत्कालीन धर्ममार्तंड महामंडलेश्वर, शंकराचार्य, महंत, संत, साधु, पिर, फकिर, कवी, कलावंत, साहित्यिक, रचनाकार आदिंसहीत राष्ट्रसुधारासाठी कार्य करणाऱ्या महात्मा गांधीजी, डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राधाकृष्णन, स्वातंत्र्यविर सावरकर, महामना मालवीय, सी. डी. देशमुख, श्रीमती इंदिरा गांधी, डॉ. पंजाबराव देशमुख, खान अब्दुल गफ्फार खान, पं. रविशंकर शुक्ल, डॉ.हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, आचार्य कृपलांनी, आचार्य आर्यनायकम्, साथी जयप्रकाश नारायण, श. वा. किर्लोस्कर, पं. सातवडेकर, पद्मश्री वि. स. खांडेकर, आचार्य प्र. के. अत्रे, क्रांतीसिंह नाना पाटील, न्यायमुर्ती हिदायतुल्ला, योगीराज स्वामी सीतारामदास महाराज (मंडला), संत गाडगे महाराज, महामंडलेश्वर श्री जयेंद्र पुरीजी अशा विभिन्न क्षेत्रातील हजारो दिग्गजांनी क्रांतीयुक्त जाणीवेने अनुभवलेली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या सहस्त्रपैलु व्यक्तीमत्वाच्या रहस्याचा मागोवा तत्कालीन सर्वस्तरातील नामवंतांनी किंबहुना प्रज्ञावंतांनी घेतलेला होता व तेवढ्याच मुक्तकंठाने प्रशंसायुक्त शब्दाने महनियतेच्या कोंदनातून जगाच्या समोर मांडलाही होता. केवळ राष्ट्र, समाज, मनुष्य व विश्व यासह वैश्विक, ब्रह्मांडीय पातळीवरील आध्यात्मिक, वैज्ञानिक अनुसंधानाचे क्रियाशील वैचारिक प्रयोग राष्ट्रसंतांनी त्यांच्या 'ग्रामगीता' या अजोड व बेजोड़ हृदयरुपी युगग्रंथातून तसेच अन्यत्र साहित्यातून मांडलेले आहेत म्हणूनच त्यांच्या या अफाट कार्यकर्तृत्वाला तोड नाही. १९६६ मध्ये आपल्या कार्याच्या अंतिम प्रवासात राष्ट्रसंतांनी गुरुकुंज आश्रमाच्या जवळ टेकडीवर 'रामकृष्णहरि मंदिर' अर्थात विश्वमानव मंदिराचा व जागतिक ग्रंथालयाची संकल्पना दासटेकडीवर ध्यानसाधनेचं अध्यात्म केंद्र कार्यान्वित केले. १९६७ साली महाराष्ट्रात कोयना येथे झालेल्या भिषण भुकंपात निराश्रीत झालेल्या लोकांना गुरुदेव सेवामंडळाच्या हजारो शाखेद्वारे व स्वतः प्रत्यक्ष जाऊन राष्ट्रसंतांनी सहाय्यता दिली.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रमात विश्वशांती, मानवता, विश्वबंधुता व विश्वकल्याणाकरिता सर्वधर्मातील धर्मबांधव एकाच स्थळी येऊन विश्वव्यापक श्रीगुरुदेव शक्तीची उपासना करावी यासाठी 'है प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्गसम संसार हो' या सामुदायिक प्रार्थनाची रचना केली व सर्वधर्मीयांसाठी 'श्रीगुरुदेव प्रार्थना मंदिर' स्थापून 'सर्वधर्म अधीष्ठानाची' योजना केली. सन् १९६८ साली जीवनभराच्या अखंड प्रवासातून व कार्यकृतीतून झिजलेल्या, थकलेल्या शरीराला असह्य वेदना जाणवत होत्या. अशाही अवस्थेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे राष्ट्रभक्तीने भारलेले 'खंजिरी भजन' सतत देशसुधारणेची गर्जना करित होते. तरी सुद्धा ६ जुलई १९६८ पंढरपूर येथे हनुमान मैदानात आषाढी एकादशीचे शेवटचे भजन करून पंढरीनाथाच्या चरणी खंजरी ठेवली ती पुन्हा न उचलण्यासाठी राष्ट्रधर्माचा अंगीकार केलेला ह्या योद्धयाचे मानवी शरीर थकले होते. डॉक्टरांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 'कॅन्सर' हा रोग झाल्याचे निदान मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केले होते. ही बातमी वाऱ्यासारखी सर्व देशभर पसरली होती त्यामुळे देशभरातील स्नेहीजनांच्या, भक्तपरिवाराच्या, अनुयायांच्या हृदयावर चिंतेचे चरे आरपार पडले होते. मुंबई येथे रुग्णशैय्येवरूनच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी राष्ट्रासाठी व्यापक लेख लिहून, स्नेही प्रेमीजनांसाठी आर्त संदेश देऊन निर्वाणाची तयारी चालविली होती. कोट्यावधी लोकांच्या जीवनात क्रांतीचे स्फुलिंग चेतविणारे हे क्रांतीनायक अंतिम यात्रेला प्रस्थान करत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समग्र आयुष्याचं निर्माण म्हणजे त्यांच गुरुकुंज आश्रम. या पवित्र 'मानवताधामात' मुंबईवरुन आगमण करण्यात आले. कॅन्सरच्या वेदना किती भयंकर असतात तसे प्रतिपादन करून दीनदुबळ्या लोकांना उपचाराची सोय व्हावी म्हणून नागपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले.
 
अंतिम संदेश देऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजरुपी अखंड सेवाव्रती, क्रांतीकार्याचे झंझावात, नायकांचेही नायक, वैश्विक मानवतेचे महानपुजारी, ईश्वरीय अधीसत्तेचे अद्वितीय जाणकार तसेच जनशक्तीच्या अंतर्मनावर प्रेमाने, स्नेहाने, भक्तीने, सुधारणेने अधिराज्य करणारे प्रेमयोगी, ज्ञानयोगी, कर्मयोगी, राजयोगी, जीवनयोगी, विश्वयोगी सन् १९६८ साली शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर रोजी अश्विनवद्य पंचमीला दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांच्या इच्छे प्रमाणे गुरुकुंज आश्रमाच्या समोरील हायस्कूलच्या मैदानात दि. १२ ऑक्टोंबर १९६८ रोजी हिंदु, मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, जैन आदि सर्व धर्माच्या धर्मगुरुंच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या मंगलनिनादात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना लाखो भक्तजनांच्या, राजकीय नेते, समाजसुधारक यांच्या उपस्थितीत १६० वर्षीय योगीराज सीतारामदास महाराज (मंडला) यांच्या हस्ते अग्निसंस्कार करण्यात आला व त्याच ठिकाणी त्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे मंदिर न बांधता थोडक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सबंध जीवनप्रतिकात्मकरित्या शांतीस्थान पंचवटी (समाधी स्थळ) राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर नागपूर-अमरावती मार्गावर साकारण्यात आले आहे. असं हे मृत्यूंजयाचं एक प्रचंड वादळी जीवन- 'कहे तुकड्या आंधी लाऊ, मैं भी मरकर जी जाऊ।।' हा संकल्प घेऊन गुरुकुंज आश्रमातील मानवतेच्या महान जनमंदिरात स्थिर झालं. त्यांच्या चैतन्यरुपी उर्जेची अनुभूती आजही अनुभवास येते आणि आजही वातावरणात त्यांचा संदेश ध्वनी गुंजतो आहे. गुरुदेव ! ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो। सद्धर्म-सूरज की प्रभा से दम्भ सारे चूर हो।। अध्यात्म औ विज्ञान के संयोग से सब हो सुखी । सहयोग - समता से यही सृष्टी करें हम स्वर्ग की ।। मिट जाय हिंसाचार सब, 'मानव' बने सबकेहि दिल | हिंसा पशूवत् कर्म है, यह कह सके सब साथ मिल || ऐसा अनुग्रह हो सभी घर-घर में साधू सन्त का । तब शान्ति होगी विश्व में, तुकड्या कहे पथ अन्त का ।।
 
 

मानवतेचे महान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जीवनपट (सन १९०९ - १९६८)

❖३० एप्रिल १९०९ - जन्म } यावली, जिल्हा अमरावती (महाराष्ट्र) येथे (ठाकूर) ब्रह्मभट घराण्यात जन्म.

❖११ मे १९०९ - प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज (माधान) व आकोट येथील सिद्धपुरुष हरिबुवा यांच्या पावन उपस्थितीत 'माणिक' नामाभिधान. गुरूंनी 'तुकड्या' हे नाव दिले. वडिलांचे नाव बंडोजी, आईचे नाव मंजुळा, आडनाव- इंगळे.

❖१९१६-१९२३ - प्राथमिक शिक्षण गाव यावली, चांदूरबाजार, वरखेड, जिल्हा-अमरावती. इयत्ता ४थी (उत्तीर्ण)

❖१९२०-१९२१ - वरखेड, जिल्हा- अमरावती येथे बाळ माणिक त्यांचे सद्गुरू समर्थ अडकोजी महाराजांच्या सेवेत.

❖१५ नोव्हेंबर १९२१ - वरखेड गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सदगुरु समर्थ आडकोजी महाराज समाधिस्थ.

❖१९२५ - श्रीक्षेत्र सालबर्डीच्या घनदाट जंगलात वनविहार, वास्तव्य आणि ध्यान

❖१९२५ - श्रीक्षेत्र रामटेक, जि. नागपूर, प्रदेश अंबाला, रामसागर तलाव, नागार्जुन टेकडी, कपूरबावडी येथील हटयोग साधना, नारायण टेकडी परिसरातील घनदाट जंगलातील वनभ्रमण आणि साधनाकाळातील मंडला (म.प्र.) येथील रहिवासी १६० वर्षे जुने योगीराज स्वामी सीतारामदासजी महाराज यांच्याशी प्रथम स्नेह भेट

❖१९२५ - नेरी, ताडोबा, रामदिघी, सातबहिणी पहाड, गोंदोडा, जि. चंद्रपूरच्या घनदाट जंगलात वन्य प्राण्यांसमवेत एकत्र निवास आणि साधना

❖२५ जुलै १९२६ - चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे 'माणिक प्रासादिक बाळसमाज मंडळा'ची स्थापना

❖१९२७ - 'आनंदमृत' आणि 'आत्मप्रभाव' या आध्यात्मिक ग्रंथांचे लेखन

❖२७ ऑगस्ट १९२९ - तुकड्यादासकृत प्रासादिक स्वरचित प्रथम भजनावलीचे प्रकाशन (चिमूर, जिल्‍हा चंद्रपूर)

❖२७ ऑगस्‍ट १९३० - स्‍वातंत्र्य संग्रामातील जंगल सत्याग्रही शिबिरांमध्ये भजनांच्‍या माध्‍यमातून जनजागृती आणि स्‍वातंत्र्य संग्रामात सक्रीय सहभाग

❖१९३० - ब्रिटिश सरकारद्वारे महाराजांना चिमूर, (जिल्हा चंद्रपूर) येथून ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न, ‘झूठी गुलामशाही क्या डर बता रही है’ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनावर ब्रिटिश सरकारने बंदी घातली.

❖३० सप्टेंबर १९३० - मोजरी, जिल्हा अमरावती येथे प्रथम आगमन

❖१९३३ - आरती मंडळाची स्थापना.

❖४ एप्रिल १९३५ - मोझरी जिल्हा अमरावती, येथे धर्म सेवाश्रमाची स्थापना

❖२४/०२ ते ०४/०३/१९३५ - सालबर्डी येथे अभूतपूर्व महारुद्रयागयज्ञ

❖३० मार्च १९३६ - श्री. गणपतराव टिकेकर यांच्या नागपूर येथील निवासस्थानी महात्मा गांधी यांच्यांशी पहिली भेट. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे भजन ऐकून प्रभावित झालेल्या गांधींनी मौन तोडले

❖१४/७ ते १३/८/१९३६ - महात्मा गांधीजी यांच्या आग्रहास्तव सेवाग्राम आश्रम येथे वास्तव्य, डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, सरहद गांधी, कस्तुरबा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण आणि इतर राष्ट्रीय नेत्यांचा परिचय

❖१९३७ - नागठाना, जिल्हा बैतुल येथे चातुर्मासाचे आयोजन

❖मे-जून १९४२ - मोझरी (गुरुकुंज) धर्म सेवाश्रम येथे राष्ट्रीय शिक्षण प्रशिक्षण आयोजित करून तरुणांना देशभक्तीची दीक्षा

❖१९४२ - भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीत सक्रिय सहभाग, खंजिरी भजनाच्या माध्यमातून ग्रामीण जनतेमध्ये देशभक्तीची भावना जागृत करून त्यांना स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण करण्याची प्रेरणा दिली. परिणामी यावली (जिल्हा अमरावती), आष्टी (जिल्हा - वर्धा) आणि चिमूर ( जि. चंद्रपूर) या गावांसमवेत संपूर्ण विदर्भात क्रांती

❖२८ ऑगस्ट १९४२ - वर्धा आणि चिमूर (जिल्हा चंद्रपूर) आदी गावांसह संपूर्ण विदर्भात क्रांती झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना विदर्भातील क्रांतीचे प्रणेते म्हणून ब्रिटीश सरकारने पहाटे ४ वाजता (धारा २६ (१)>स्थानबद्धता अधिनियमानुसार) चंद्रपूर येथे बंदी बनवून (कैदी क्र. ७७४) नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात २१ सप्टेंबर १९४२ पर्यंत स्थानबद्ध केले.

❖२१ सप्टेंबर १९४२ - नागपूर मध्यवर्ती कारागृहातून रायपूर येथील मध्यवर्ती कारागृहात महाराजांना स्थानांतरित केले. (कैदी क्र. ४९७)

❖२ डिसेंबर १९४२ - रायपूर मध्यवर्ती कारागृहातून महाराजांची सुटका आणि ब्रिटीश सरकारने त्यांच्या चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यात प्रवेशावर बंदी घातली .

❖१७ ते २४ जानेवारी १९४३ - या कालावधीत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी अकोल्यात विश्वशांती सप्ताहाचे आयोजन केले

❖५ एप्रिल १९४३ - श्रीगुरुदेव सेवामंडळाचे मुखपत्र "श्रीगुरुदेव मासिक" चा शुभारंभ व पहिला अंक प्रकाशित.

❖१ ऑगस्ट १९४३ - अमरावती येथे स्वातंत्र्यवीर बॅ. दामोदर सावरकर यांना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी सन्मानित केले आणि त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी उत्साहाने कार्य करण्याची प्रेरणा दिली.

❖१९४३ - बंगाल प्रांतातील दुष्काळात सेवा मंडळाची मदत.

❖११ नोव्हेंबर १९४३ - कार्तिक पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर ११ नोव्हेंबर १९४३ रोजी वरखेड येथे ‘आरती मंडळाचे’ नामांतर 'श्री गुरुदेव सेवामंडळ’ असे करण्यात आले.

❖१९४३ - ४५ - विधायक कार्यक्रम, बळीप्रथेवर बंदी, अस्पृश्यांना मंदिरप्रवेश, मादक पदार्थांवर बंदी, आखाड्याचे संघटन, दलित उद्धार, अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादींसाठी जनआंदोलन केले.

❖३० एप्रिल १९४७ - मोझरी येथे स्थापन झालेल्या धर्मसेवाश्रमाचे श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज आश्रम असे नामाभिधान आणि उद्घाटन (मध्य प्रदेश वऱ्हाडचे मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला यांच्या उपस्थितीत)

❖१० मे १९४७ - पंढरपूरच्या ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात हरिजन बांधवांच्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह आंदोलन करून साने गुरुजींसह असंख्य हरिजन बांधवांच्या उपस्थितीत मंदिर प्रवेश

❖१९४७ - गोहत्याबंदी जनजागृती आणि चळवळ

❖१० नोव्हेंबर १९४७ - रामटेक (जि. नागपूर) येथील ऐतिहासिक राम मंदिर, प्रवेश सत्याग्रह आंदोलनाद्वारे हरिजनांसाठी खुले करण्यात आले.

❖२६ जानेवारी १९४८ - नागपूर येथील कस्तुरचंद पार्क येथील होमगार्ड परेडला उपस्थिती आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटनसोबत चर्चा

❖१९४८ - हैदराबादच्या जुलमी निजाम शासकाच्या रझाकारांच्या जुलुमाविरुद्ध तुकडोजी महाराजांद्वारे हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात श्री गुरुदेव सेवामंडळातर्फे 'रझाकार प्रतिकार मंडळ' स्थापन करून सक्रिय सहभाग

❖१ एप्रिल १९४८ - सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासोबत त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट

❖१८ डिसेंबर १९४८ - जयपूर येथे आयोजित सर्वोदय प्रदर्शनीत सरदार वल्लभभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांची भेट आणि जाहीर भाषण.

❖१२ फेब्रुवारी १९४९ - गुरुकुंज आश्रमात आयोजित पहिल्या गांधी स्मृती दिनाच्या श्रद्धांजली समारंभाला भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थिती, यावेळी तुकडोजी महाराज यांना डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाराजांना ‘राष्ट्रसंत’ या पदवीने सन्मानित केले.

❖६ जुलै १९४९ - पंढरपुरात संत संमेलनाचे आयोजन. सोबत वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, आचार्य गो. नि. दांडेकर, श्री धुंडा महाराज, श्री कैकाडी महाराज, श्री तनपुरे महाराज, श्री चौंडा महाराज आदींची उपस्थिती.

❖२४ डिसेंबर १९४९ - सेवाग्राम येथे झालेल्या ५८ राष्ट्रांतील १०० शांततावादी विचारवंतांच्या परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत तुकडोजी महाराजांचे संबोधन

❖१ जानेवारी १९५० - नागपूर येथे आयोजित अ. भा. युवक परिषदेत तुकडोजी महाराजांचे जाहीर स्फूर्तिदायी भाषण आणि भजन, यावेळी पटवर्धन मैदानावर झालेल्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू, अध्यक्ष बाबू महामायाप्रसाद, राज्यपाल डॉ. श्री मंगलदास पक्वासा आदींची उपस्थिती

❖३० जानेवारी १९५० - राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी नागपुरात आयोजित केलेल्या महात्मा गांधींच्या दुसऱ्या स्मृतीदिनाचा आरंभ, आचार्य कृपलानी यांच्या हस्ते सुरुवात, हजारो लोकांनी चरख्यावर सूट जातंय करून सामुदायिक मूक श्रद्धांजली अर्पण केली – यावेळी मुख्यमंत्री पं. रविशंकर शुक्ला, पं. द्वारकाप्रसाद मिश्रा, कुलगुरू कुंजीलाल दुबे, बॅ. युसूफ शरीफ, न्यायमूर्ती हिदायतुल्ला, आचार्य धर्माधिकारी आणि संत गाडगे बाबा यांची उपस्थिती

❖३० डिसेंबर १९५० - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची गुरुकुंज आश्रमाला भेट आणि श्री गुरुदेव अध्ययन मंदिराचे उद्घाटन.

❖१७ जुलै १९५१ - पंढरपूर येथील आर्यविद्याधाम येथे राष्ट्रसंतांतर्फे अपूर्व संत संमेलनाचे आयोजन. संत गाडगे महाराज, श्री सोनोपंत दांडेकर, गोभक्त चौडे महाराज, ह. भ. प. धुंडा महाराज, प्रकर नुंदीकर महाराज, श्री यशवंतराव गोंदवलेकर महाराज, संत गयाबाई मनमाडकर, शेलार मामा, शिंदे महाराज, तनपुरे महाराज आदींसह अनेक संत व वारकऱ्यांच्या उपस्थिती

❖५ जुलै १९५२ - पंढरपूर येथील आर्य धर्मशाळा येथे राष्ट्रसंतांतर्फे दुसऱ्या संत संमेलनाचे आयोजन, श्रीसंत गाडगे महाराज, धुंडा संत गयाबाई मनमाडकर, ह.भ.प. कैकाडी तनपुरे शिंदे ह. भ. प. श्री कवडे शास्त्री, किसन महाराज खर्डेकर, नामानंद इ.अनेक व वारकऱ्यांची उपस्थिती

❖२९ जानेवारी १९५३ - आमगाव जिल्हा भंडारा आदर्श ग्राम योजनेचे प्रात्यक्षिक ( रेल्वे मंत्री श्री. लाल बहादूर शास्त्री, सौ. राधादेवी गोयंका आणि संत गाडगेबाबा यांची उपस्थिती)

❖१३ ते १५ मार्च १९५३ - गुरुकुंज आश्रमात विदर्भ साहित्य संमेलनाचे आयोजन.

❖१ ते १२ मे १९५३ - विनोबा भावे यांनी आयोजित केलेल्या भूमी दान यज्ञात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा सक्रिय सहभाग (अकरा दिवसांत ११,४१० हजार एकर भूदान राष्ट्रसंतांनी मिळवले)

❖२२ जुलै १९५३ - ग्रंथराज ग्रामगीतेचे लेखन सुरू झाले.

❖२४ जुलै १९५३ - पंढरपूर येथील आर्य विद्याधाम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यातर्फे तृतीय संत संमेलनाचे आयोजन, संत गाडगे महाराज, ह. भ. प. सोनोपंत दांडेकर, गोभक्त चोंडे महाराज, ह. भ. प. धुंडा महाराज, ह. भ. प. शेलार मामा महाराज, श्रीसंत कैकाडी महाराज, संत शिंदे महाराज, संत मुकुंद महाराज, संत गोंदवलेकर महाराज, संत महाराज देहूकर, संत कवडे महाराज आदींसह अनेक संत व वारकऱ्यांची उपस्थिती

❖१० नोव्हेंबर १९५३ - अ. भा. राष्ट्रभाषा परिषद प्रचार संमेलन नागपूर येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती, डॉ. पट्टाभी सीतारामय्या राज्यपाल -(म. प्र.), न. भी. गाडगीळ ऊर्जा आणि खाण मंत्री भारत सरकार, श्री प्रकाशजी, राज्यपाल (मद्रास) आणि साहित्यिक यांची देखील उपस्थिती

❖७ ते ८ फेब्रुवारी १९५४ - भारत सेवक समाज, बिहार (पावापुरी) च्या पहिल्या परिषदेत भजन आणि भाषण. गुलझारीलाल नंदा आदी नेते उपस्थित

❖३० जानेवारी १९५४ - रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे भजन कार्यक्रम आणि राजघाट येथे गांधी स्मृती दिनानिमित्त प्रार्थनेट सहभाग व भजन. राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, सरदार वल्लभभाई पटेल, लाल बहादूर शास्त्री आदी नेते उपस्थित होते.

❖३१ जानेवारी १९५४ - लाल किल्ला, दिल्ली येथे झालेल्या जैन धर्म परिषदेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजजींचे प्रमुख मार्गदर्शन

❖आचार्य तुलसी व आदि धर्माचार्य उपस्थित होते.

❖१२ ते १७ मार्च १९५४ - या कालावधीत सह्याद्री आणि सुरगुजा जिल्ह्यातील आदिवासी भागात 'आदिवासी सुधार' यात्रा काढण्यात आली.

❖३० जून १९५४ - भारताचे पहिले अर्थमंत्री श्री चिंतामणराव देशमुख आणि त्यांच्या पत्नी श्रीमती दुर्गाबाई देशमुख यांची गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट.

❖१४ जुलै १९५४ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजज यांच्यातर्फे आर्यधाम, पंढरपूर येथे चौथे संत संमेलनाचे आयोजन, श्रीसंत गाडगे महाराज, मामासाहेब दांडेकर, भागवतबुवा देहूकर, गोभक्त श्री चौंडे महाराज, श्रीसंत कैकाडी महाराज, श्रीसंत तनपुरे महाराज, श्रीसंत भागवतबुवा देगलूरकर आदी संत उपस्थित

❖२८/२ ते ४/३/१९५५ - विंध्य प्रदेशात आयोजित दुसऱ्या हरिजन परिषदेचे संमेलनाध्यक्ष व मार्गदर्शन.

❖१२ मार्च १९५५ - भारत सेवक समाजाने नागपुरात आयोजित केलेल्या परिषदेत राष्ट्रसंतजींचे भाषण, पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची उपस्थिती

❖२४ ते २७ मार्च १९५५ - या कालावधीत पाचव्या अ. भा. सर्वोदय संमेलनाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे भाषण आणि खंजिरी भजन.

❖१० मे १९५५ - हरिद्वार येथे आयोजित अखिल भारतीय गौ- सेवा परिषदेचे अध्यक्ष आणि भजन व भाषण.

❖२४ जुलै १९५५ - जपानमधील शिमिझू शहरात आयोजित पाचव्या जागतिक धर्म आणि शांतता परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी १८ राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

❖२५/७ ते २४/८/१९५५ - मलेशिया, थायलंड, टोकियो, निको, हाँगकाँग, बँकॉक आणि ब्रह्मदेश दौरा.

❖१० नोव्हेंबर १९५५ - अमृतसर येथे आयोजित अ. भा. वेदांत परिषदेत प्रमुख उपस्थिती आणि प्रबोधन.

❖१४ नोव्हेंबर १९५५ - पंजाबमधील पूरग्रस्त भागाला भेट आणि श्री गुरुदेव सेवामंडळातर्फे मदतकार्य

❖२५ डिसेंबर १९५५ - तुमसर येथे झालेल्या विदर्भ साहित्य संमेलनात युगग्रंथ ‘ग्रामगीता’चे अनावरण

❖१ जानेवारी १९५६ - सेवाग्राम येथे आयोजित अ. भा कुंभार परिषदेत प्रबोधन.

❖१८ ते १९ फेब्रुवारी १९५६ - बिर्ला मंदिर दिल्ली येथे 'भारत साधू समाज' नामक संस्थेचे राष्ट्रीय संत श्री तुकडोजी महाराजजींच्या अध्यक्षतेखाली स्थापना, सभेला उपस्थित असलेल्या विविध आखाड्यांच्या धर्माचार्य आणि संतांनी राष्ट्रसंतजींची प्रथम अध्यक्ष म्हणून एकमताने निवड केली. स्वामी शुकदेवानंद, स्वामी सर्वानंद, स्वामी चिन्मयानंद, स्वामी अखंडानंद, स्वामी रामपथरदास, स्वामी निजानंद, स्वामी हरिनारायणंद, डॉ.राजेंद्र प्रसाद, श्री गुलझारीलाल नंदा, श्री नारायण अग्रवाल आदी उपस्थित होते.

❖१९ मार्च १९५६ - इंदिराजी गांधी यांची गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट व भाषण.

❖९ एप्रिल १९५६ - अखिल भारतीय साधू समाजाची पहिली परिषद परमार्थ निकेतन, ऋषिकेश येथे आयोजित

❖५ डिसेंबर १९५६ - दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित युनेस्को परिषदेचे राष्ट्रसंतांच्या हस्ते उद्घाटन,

❖२१ डिसेंबर १९५६ - वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांचे अमरावती येथे महानिर्वाण आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या हस्ते त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, श्रद्धांजली आणि भाषण.

❖२८ जानेवारी १९५८ - उपराष्ट्रपती डॉ. श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांची गुरुकुंज आश्रमाला सदिच्छा भेट

❖१८ एप्रिल १९५९ - यवतमाळ (महाराष्ट्र) येथे ३४ कलम मैदानावर झालेल्या भूदान पूर्ती समारंभात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याद्वारे भूदान, या अभूतपूर्व सहकार्याला सदिच्छा देण्यासाठी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू उपस्थित

❖१ ते ३ सप्टेंबर १९६१ - दिल्ली येथे आयोजित केला आहे अ. भा. व्यसनमुक्ती परिषदेला संबोधन (उदघाटक श्री. मोरारजी देसाई)

❖३ मे ते २८ जून १९६१ - श्रीगुरुदेव भारत दर्शन किसान रेल यात्रेचे आयोजन.

❖२० डिसेंबर १९६२ - भारत-चीन युद्धाच्या वेळी नेफा सीमेवरील रणांगणावर भारतीय सैनिकांसमोर संरक्षण मंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्यासमवेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रेरणादायी भजन आणि भाषण

❖२९ ते ३० ऑगस्ट १९६४ - सांदीपनी आश्रम (मुंबई) येथे विश्व हिंदू परिषदेची स्थापना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापक सदस्य. श्री गोळवलकर गुरुजी, श्री दादासाहेब आपटे, शंकराचार्य कांचीपीठ, स्वामी चिन्मयानंद, मास्टर तारासिंग यांची उपस्थिती

❖२७ ते २८ फेब्रुवारी १९६५ - दिल्लीच्या रामलीला मैदानावर विश्व हिंदू परिषदेचे भव्य आयोजन, परिषदेचा शुभारंभ 'हर देश में तू हर भेष में तू या भजनाने झाला. मोरारजी देसाई, लालबहादूर शास्त्री, गुलझारीलाल नंदा उपस्थित.

❖१६ ते १७ नोव्हेंबर १९६५ - मुंबईत विश्व हिंदू परिषदेच्या सभेत उपस्थिती,

❖३१ डिसेंबर १९६५ - भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पंजाब सीमेवर लाहोर सेक्टरमध्ये तैनात असलेल्या सैनिकांसमोर स्फूर्तिदायक भाषण आणि भजन

❖५ ते ८ डिसेंबर १९६५ - अ. भा. श्रीगुरुदेव सेवामंडळ संचालक मंडळाच्या स्वाधीन करून स्वनिवृत्ती

❖२१ जानेवारी १९६६ - प्रयाग येथे कुंभमेळ्यात उपस्थिती, भाषण आणि भजन

❖२१ ते २४ जानेवारी १९६६ - विश्व हिंदू परिषदेच्या (प्रयाग) अलाहाबाद येथे आयोजित केलेल्या भव्य संमेलनात अध्यक्षीय भाषण आणि भजन

❖ऑक्टोबर १९६६ - राष्ट्रसुरक्षा संमेलन नागपूर येथे भाषण

❖५ नोव्हेंबर १९६७ - गुरुकुंज येथे आयोजित ४५ व्या अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष या नात्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि उदघाटक म्हणून उपपंतप्रधान श्री. मोरारजी देसाई यांची उपस्थिती

❖१७ ते १९ सप्टेंबर १९६७ - भक्ति संमेलन नाशिक कुंभमेळा महिला संमेलनात भजन आणि भाषण.

❖४ ते ६ जानेवारी १९६८ - कोयना येथील भूकंपपीडितांना अ. भा श्री गुरुदेव सेवामंडळाद्वारे मदत आणि भजन कार्यक्रम

❖७ जुलै १९६८ - पंढरपूरच्या हनुमान मंदिराच्या मैदानावर आषाढी एकादशीच्या पर्वावर एक तास तीस मिनिटेपर्यंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अखेरचे भजन.

❖२० जुलै १९६८ - बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे उपचारांसाठी दाखल

❖२३ ऑगस्ट १९६८ - बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे शस्त्रक्रिया करून राष्ट्रसंत गुरुकुंज आश्रमात परतले

❖११ ऑक्टोबर १९६८ - राष्ट्रसंतांचे महानिर्वाण, शुक्रवार (अश्विन वद्य पंचमी) दुपारी ४ वाजून ५८ मिनिटांनी

❖१२ ऑक्टोबर १९६८ - राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या पार्थिवावर स्वामी सीतारामदास महाराज यांच्या हस्ते गुरुकुंज आश्रमात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना सुधाकरराव यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

 
Powered By Sangraha 9.0